आगामी काही महिन्यांत राज्यातील स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याने मुंबई महापालिकेवर पुन्हा वर्चस्व मिळवण्याची मोहीम शिवसेना पक्षाने जोरात सुरू केली आहे. मुंबई महापालिका हा पक्षाचा बालेकिल्ला समजला जातो आणि गेल्या 25 वर्षांपासून या संस्थेवर शिवसेनेचे अधिराज्य राहिले आहे. निवडणुकांची घोषणा अद्याप झाली नसली, तरी शिवसेना पक्षाने आतापासूनच मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. महापालिकेवर वर्चस्व टिकवण्यासाठी संघटनात्मक पातळीवर हालचाली वेगाने सुरू असून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबईतील पायाभूत सुविधांपासून ते मराठी मतदारांच्या भावना जपण्यापर्यंत अनेक मुद्द्यांवर पक्षाने आता पुन्हा आक्रमक होण्याचे संकेत दिले आहेत. आगामी निवडणूक शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे, या अनुषंगाने पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्यांवर विधानसभा निहाय जबाबदाऱ्या वाटप करण्यात आल्या आहेत. या दरम्यान 12 उपनेत्यांवर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ठाकरे गटाकडून मुंबई महानगर पालिकेसाठी विशेष तयारी सुरू केली आहे.
ठाकरे गटाकडून मुंबईतील उपनेत्यांवर विशेष जबाबदारी
1. अमोल कीर्तीकर – दहिसर, बोरिवली, मागाठाणे
2. उद्धव कदम – चारकोप, कांदिवली, मालाड पश्चिम
3. विलास पोतनीस – दिंडोशी, गोरेगाव, जोगेश्वरी पूर्व
4. विश्वासराव नेरूरकर – वर्सोवा, अंधेरी पूर्व, अंधेरी पश्चिम
5. रवींद्र मिर्लेकर – विलेपार्ले, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम
6. गुरुनाथ खोत -, चांदिवली, कलीना, कुर्ला
7. नितीन नांदगावकर * विक्रोळी, भांडुप, मुलुंड
8. सुबोध आचार्य – घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम, शिवाजीनगर – मानखुर्द
9. मनोज जमसूतकर – अनुशक्ती नगर, चेंबूर, सायन कोळीवाडा
10. अरुण दूधवडकर – धारावी, माहीम, वडाळा
11. अशोक धात्रक – वरळी, दादर, शिवडी
12. सचिन अहिर – मलबार हिल, कुलाबा, मुंबादेवी
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया आता वेग घेत असून, प्रशासकीय पातळीवर आवश्यक तयारी सुरू करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी प्रभाग रचना करण्याचे आदेश जारी केले आहेत. सरकारने दिलेल्या आदेशानुसार ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ वर्गातील महानगरपालिकांसाठी प्रभाग रचना करण्यात येणार आहे. यामध्ये पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, वसई-विरार, छत्रपती संभाजीनगर आणि कल्याण-डोंबिवली या प्रमुख महापालिकांचा समावेश आहे.
गेल्या तीन ते चार वर्षांपासून विविध कारणांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर राज्य सरकारने निवडणूक प्रक्रियेला गती दिली आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार, संबंधित महापालिकांमध्ये प्रभाग रचनेबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले असून, लोकसंख्येच्या निकषानुसार प्रभाग निश्चित करण्याचे धोरण ठरवण्यात आले आहे. यामध्ये विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या असून, लवकरच या प्रभाग रचनेवर आधारित अंतिम आराखडा तयार केला जाणार आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीचा मार्ग मोकळा झाला असून, येत्या काही महिन्यांत राज्यातील विविध महापालिका क्षेत्रांत मोठी राजकीय चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.