७/१२ सदरी झालेल्या नोंदी, कर्ज प्रकरणाच्या नोंदी व अर्जदार समीर ईलाही तांबोळी यांनी केलेल्या खरेदीपत्राचा दस्तऐवज या सर्व बाबी विचारात घेऊन मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश अमित बोरकर यांनी समीर तांबोळी यांचा जामीन अर्ज फेटाळून लावलेला आहे. त्यामुळे समीर तांबोळी यांचा अटकपूर्व जामीन नामंजूर झाला असल्याची माहिती विटा अर्बन को- ऑप. क्रेडीट सोसायटीच्यावतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. विटा अर्बन को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि. विटा यांनी समीर ईलाही तांबोळी यांच्याविरुध्द दि. ०४/०१/२०२१ रोजी गुन्हा नोंदविला होता.
समीर तांबोळी यांनी विटा अर्बन को-ऑप. क्रेडीट सोसायटीला कसबे विटा येथील रि.स.नं. ४५७/४क यातील प्लॉट हा कर्ज रक्कमेकरीता तारण-गहाण दिलेला होता. तोच प्लॉट समीर तांबोळी यांनी सागर दिलीप शेंडगे (रा. पेड, ता. तासगांव, जि. सांगली) यांना रजि. खुषखरेदीपत्राने विकलेला होता. त्यामुळे विटा अर्बन सोसायटीची खोट्या कागदपत्रानुसार फसवणुक झालेली होती. त्यामुळे विटा अर्बन सोसायटीने विटा पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली होती. समीर तांबोळी यांचा जिल्हा सत्र न्यायालय, सांगली यांनी अटकपूर्व जामीन फेटाळलेला होता. त्यावर समीर तांबोळी यांनी मुंबई हायकोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दिलेला होता.
समीर तांबोळी यांचा अटकपूर्व जामिन अर्ज उच्च न्यायालयापुढे सुनावनीस प्रलंबीत असताना दि. ३० जुन २०२३ रोजी समीर तांबोळी यांनी उच्च न्यायालयाला ८ लाख ५० हजार रुपयांची रक्कम ६ आठवड्याच्या आत भरणा करण्याची हमी दिली होती. परंतु अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला जाईपर्यंत त्याने तसा भरणा केलेला नाही. त्यावर अर्जदार तांबोळीच्या वकीलांनी त्याच्याशी संपर्क होत नसल्याचे न्यायालयास सांगितले. अंतिमतः ७/१२ सदरी झालेल्या नोंदी, कर्ज प्रकरणाच्या नोंदी व अर्जदार तांबोळी यांनी केलेल्या खरेदीपत्राचा दस्तऐवज या सर्व बाबी विचारात घेऊन मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश अमित बोरकर यांनी समीर तांबोळी याचा जामीन अर्ज फेटाळून लावलेला आहे.