कॉलेजांच्या मनमानी कारभारावर नियंत्रणासाठी प्रवेश नियमांत सुधारणा

राज्यातील कॉलेजांना (Colleges) इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीए, एमसीए, आर्किटेक्चर अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांना मॅनेजमेंट कोट्यातून विद्यार्थ्यांना प्रवेश देताना आता पारदर्शक पद्धतीचा अवलंब करावा लागेल. मॅनेजमेंट कोट्यासाठी एखाद्या विद्यार्थ्यांचा अर्ज कॉलेजने स्थानिक पातळीवर नाकारला, तर त्याला थेट ‘सीईटी सेल’ मार्फत अर्ज करता येणार आहे. संबंधित विद्यार्थी गुणवत्ताधारक असल्यास, त्याचा प्रवेश नाकारता येणार नाही. त्यामुळे कॉलेजांकडून मॅनेजमेंट कोट्यासाठी मनमानी पद्धतीने राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेवर नियंत्रण ठेवता येणार आहे.

राज्य सरकारने महाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क) अधिनियमात सुधारणा केल्या आहेत. त्याचा फायदा ‘सीईटी सेल’कडून राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना होणार आहे. मॅनेजेमेंट कोट्यातील प्रवेशप्रक्रिया कॉलेजांच्या स्तरावर राबविण्यात येत होती. या कोट्यातून प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याच्या गुणवत्तेनुसार प्रवेशाची यादी प्रसिद्ध रायची असते. मात्र, हा नियम करायची सपशेल धाब्यावर बसवून पैसे अधिक मोजणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्याला प्रवेश मिळतो. याबाबत अनेक तक्रारी उच्च व तंत्रशिक्षण विभाग, सीईटी सेल आणि प्रवेश नियामक प्राधिकरणाकडे सातत्याने करण्यात आल्या.

या पार्श्वभूमीवर सरकारने प्रवेश प्रक्रियेच्या नियमांत बदल केले आहे. त्यानुसार एखाद्या विद्यार्थ्याला मॅनेजमेंट कोट्यातून कॉलेजांमध्ये प्रवेश घ्यायचा असल्यास, त्याला नियमित प्रवेश फेऱ्या संपण्यापूर्वी ‘सीईटी सेल’ मार्फत अर्ज करता येईल. सीईटी सेल संबंधित विद्यार्थ्यांचा अर्ज, त्या कॉलेजला पाठविणार आहे. त्यानंतर मॅनेजमेंट कोट्यासाठी एकूण अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशाची यादी कॉलेजला प्रसिद्ध करावी लागेल. या यादीनुसार विद्यार्थ्याला शैक्षणिक शुल्काच्या तीनपट शुल्क भरून प्रवेश घ्यावा लागणार आहे. त्यामुळे मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेशासाठी इच्छुक असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांला प्रवेशाची संधी मिळेल. यापूर्वी, नामांकित कॉलेजांकडून काही विद्यार्थ्यांचे मॅनेजमेंट कोट्यातून अर्जच दाखल करून घेतले जात नाहीत.

कॉलेजांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया ‘सीईटी सेल’कडून राबविण्यात येते. सुधारित नियमानुसार मॅनेजमेंट कोट्यातील प्रवेश प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी ‘सीईटी सेल’कडून नवीन संगणकीय प्रणालीची निर्मिती करण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आणि प्रणालीच्या माध्यमातूनच तो संबंधित कॉलेजांकडे पाठविणे शक्य होणार आहे. सुधारित नियमानुसार विद्यार्थ्याला अंतिम नियमित फेरीपर्यंत अर्ज करीत असल्याने, ‘सीईटी सेल’कडून शक्य तितक्या लवकर प्रणाली विकसित केली जाईल. या प्रणालीच्या आधारे कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेशासाठी अर्ज करू न शकलेल्या विद्यार्थ्यांना अर्जाची संधी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.