पुढील शैक्षणिक वर्षापासून केवळ तीन वर्षे वयाच्या मुलांनाच नर्सरीमध्ये प्रवेश मिळणार आहे. शाळा प्रवेशाचे नियम ‘एनईपी-२०२०’च्या नियमांनुसार असावेत, यासाठी धोरण तयार केले जात आहे.’एनईपी’नुसार इयत्ता पहिलीत प्रवेश करताना मुलाचे वय सहा वर्षे असावे.
नर्सरीसाठी ३ वर्षांची अट असतानाही दोन-अडीच वर्षांच्या अनेक मुलांना प्रवेश दिले. परंतु, आता तसे करता येणार नाही. मूल पहिलीत जाताना त्याचे वय सहा वर्षे पूर्ण असावे लागणार आहे.
नव्या धोरणात विद्यार्थी शाळेत प्रवेश घेतील, तेव्हा वयाचा निकष तीन वर्षांपर्यंत ठेवला जाणार असून महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या सहकार्याने धोरण तयार करण्यात येत आहे.हिवाळी अधिवेशनात शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी चिमुकल्यांच्या (बालवाडी ते दुसरीपर्यंतच्या) ज्या शाळा सकाळी सात- साडेसात वाजता भरतात, त्यांच्या वेळा बदलतील आणि पुढील शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी होईल असे स्पष्ट केले.
तत्कालीन व विद्यमान राज्यपालांनीही त्यासंदर्भातील पत्र शिक्षण खात्याला दिले आहे.दरम्यान, लहान मुले रात्री उशिरापर्यंत (साधारणत: अकरा वाजेपर्यंत) झोपत नाहीत. त्यानंतर सकाळी सात वाजता शाळेत पोचण्यासाठी त्याला सहा- साडेसहा वाजता उठविले जाते. त्यामुळे त्याला सात तासांपर्यंतच झोप मिळते आणि त्याचा थकवा शाळेत जाणवतो.
अशा मुलांमध्ये चिडचिडेपणा जास्त आढळतो आणि त्याचा परिणाम शारीरिक व मानसिक आरोग्यावर होतो, अशी स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर आता सर्वच शाळांच्या वेळा (खासगी व शासकीय) सकाळी नऊनंतर असणार आहेत, अशी माहिती राज्याच्या प्राथमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.