लाडक्या बहिणींसाठी शासनाचा मोठा निर्णय; रत्नागिरी जिल्ह्यातून मोठी अपडेट

शासनाच्या लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये काही बदल होण्याचे संकेत असताना आता शासनाकडून यासंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महिला व बाल विकास विभागाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील रत्नागिरी (Ratnagiri) पात्र लाभार्थी महिलांची ग्रुप सहकारी पतसंस्था असावी, असा मोठा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. तशा स्वरूपाचे परिपत्रकच रत्नागिरी जिल्ह्यातील सहाय्यक आयुक्त निबंधकांना पाठविण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनातर्फे लाडकी बहीण योजनेंतर्गत ज्या महिलांना आर्थिक साहाय्य देण्यात येत आहे, अशा महिलांची नागरी सहकारी पतसंस्था नोंदणी करण्याबाबत सहकार आयुक्त व निबंधक यांच्याकडून परिपत्रक पाठविण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लाभार्थी महिलांना याबाबत निकषांची माहिती देण्यासाठी तसेच संस्था स्थापन करण्यासाठी, मार्गदर्शन व साहाय्य करण्यासाठी पालक अधिकारी तसेच साहाय्यक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक सोपान शिंदे यांनी दिली.

महिला व बाल विकास विभागाच्या वतीने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविली जात आहे. या योजनेतील जिल्ह्यातील पात्र लाभार्थी महिलांची गाव तालुका व जिल्हा कार्यक्षेत्र असलेली नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करता येईल. अशा प्रकारच्या संस्था स्थापन करण्यासाठी नोंदणीचे निकष पुढीलप्रमाणे असणार आहेत. गाव कार्यक्षेत्रासाठी २५० सभासद संख्या व दीड लाख भाग भांडवल, नगरपालिका कार्यक्षेत्रासाठी ५०० सभासद संख्या व ५ लाख भाग भांडवल, तालुका कार्यक्षेत्रासाठी ५०० सभासद संख्या व ५ लाख भाग भांडवल आणि जिल्हा कार्यक्षेत्रासाठी दीड हजार सभासद संख्या व १० लाख भाग भांडवल असणार आहे.

पतसंस्थेसाठी निकष काय?
महिला सहकारी पतसंस्थेचे सभासद होण्यासाठी महिला व बाल विकास विभाग यांनी प्रमाणित केलेल्या यादीत संबंधित महिला लाभार्थीचे नाव समाविष्ट असणे आवश्यक आहे. ज्या महिलांना ‘लाडकी बहीण’ योजनेंतर्गत महिलांची नागरी पतसंस्था नोंदवायची आहे त्यांनी जिल्हा कार्यक्षेत्राच्या संस्थेसाठी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, रत्नागिरी तसेच तालुका किंवा त्यापेक्षा कमी कार्यक्षेत्रासाठी संबंधित तालुका सहायक निबंधक, सहकारी संस्था/सहकारी अधिकारी श्रेणी-१ यांच्या कार्यालयात त्या संपर्क साधू शकतात, अशी माहिती देण्यात आली.

जिल्ह्यात अशा प्रकारच्या संस्था स्थापन करण्यासाठी मार्गदर्शन व सहाय्य करण्यासाठी पालक अधिकारी म्हणून साहेबराव दत्तात्रय पाटील (सहायक, निबंधक सहकारी संस्था) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंडणगड तालुक्यासाठी सहकारी अधिकारी म्हणून भगवान कोंडीबा आखाडे, दापोली तालुक्यासाठी सहाय्यक निबंधक अनिता बटवाल, खेड तालुक्यासाठी सहकारी अधिकारी शामल क्षिरसागर, चिपळूण तालुक्यासाठी सहायक निबंधक सुशांत घोलप, गुहागर तालुक्यासाठी सहकारी अधिकारी कुमार मनोहर देवरुखकर, संगमेश्वर तालुक्यासाठी सहायक निबंधक, अक्षय भापकर, रत्नागिरी तालुक्यासाठी सहकारी अधिकारी एम. एस. धुमाळ, लांजा तालुक्यासाठी सहकारी अधिकारी संतोषकुमार शि.पाटील व राजापूर तालुक्यासाठी सहायक निबंधक संतोषकुमार शि. पाटील यांची सहाय्यक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.