ठाण्यात मराठी माणसांच्या हक्कासाठी दोन्ही शिवसेना मैदानात

मराठी माणसांवरील अन्यायप्रश्नी गेल्या काही दिवसांपासून वातावरण तापलेले असताना शिवसेनेच्या दोन्ही गटांनी या वादात उडी घेतली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी फसवणूक झालेल्या मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी थेट विकासाला धारेवर धरले. तसेच ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील दुकानात मराठी व्यक्तीला बेदम मारहाण केल्यानंतर शिवसेना माजी खासदार राजन विचारे यांनी संबंधित व्यापाऱ्यांना कार्यालयात बोलवून माफी मागायला लावली. तर मारहाण झालेल्या व्यक्तीनेही व्यापाऱ्यांच्या कानशिलात लगावली. त्यामुळे मराठी माणसांच्या हक्कासाठी दोन्ही शिवसेना मैदानात उतरल्याचे दिसत आहेत.

शालेय अभ्यासक्रमात पहिल्या इयत्तेपासून हिंदीसक्तीच्या राज्य सरकारच्या निर्णयाला विरोधाच्या निमित्ताने मनसे आणि शिवसेना (Shiv Sena) या दोन्ही पक्षांचे जोरदार शक्तिप्रदर्शन सुरु आहे. या पक्षांचे पदाधिकारी जागोजागी मराठी माणसांवरील अन्यायप्रश्नी आक्रमक होत असतानाच शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी मराठी व्यक्तीची फसवणूक केल्याप्रकरणी एका विकासकाला दूरध्वनीवरुन जाब विचारला. तसेच मराठी व्यक्तीचे पैसेही परत करण्याची तंबी म्हस्के यांनी दिली.

दुसरीकडे दोनच दिवसांपूर्वी ठाणे रेल्वे स्थानकाजवळ एका दुकानात मोबाईल रिचार्ज घेण्यासाठी बराच वेळ मराठी व्यक्ती थांबला होता. काही वेळाने येथील दुकानदारांनी त्याला रिचार्ज नसल्याचे सांगितले. त्यावरुन वाद उफाळला. या मराठी व्यक्तीला येथील तीन ते चार परप्रांतीय कामगारांनी बेदम मारहाण केली. त्यामध्ये हा व्यक्ती रक्तबंबाळ झाला. घटनेची तात्काळ दखल घेत नौपाडा पोलिसांनी या कामगारांना अटक केली. त्यांची जामिनावर सुटका होताच त्यांना माजी खासदार विचारे यांच्या चरई येथील कार्यालयात आणण्यात आले.