नाशिक (Nashik) शहरात यंदा मे महिन्यापासून पावसाचा जोर कायम कायम आहे. पावसामुळे ठिकठिकाणी पाण्याची डबकी साचल्याने जूनमध्ये डेंग्यूचे पुनरागमन झाले आहे. डेंग्यूच्या उत्पत्तीस कारणीभूत ठरणाऱ्या एडीस इजिप्ती या प्रजातीच्या डासाची उत्पत्ती स्वच्छ पाण्यातच वाढते. पावसामुळे घर परिसरातील नारळाच्या करवंट्या, निकामी टायर्स, शोभेच्या वनस्पतींच्या कुंड्या आदींमध्ये पाणी साचले. त्यात डेंग्यू डासांची पैदास झाल्याने डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे.
मे महिन्यात डेंग्यूचे अवघे ८ रुग्ण, तर जूनमध्ये २५ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी १५ रुग्ण हे सातपूर आणि सिडको या दोन विभागात तर, १० रुग्ण हे नाशिक पूर्व, पश्चिम, नाशिकरोड आणि पंचवटी या चार विभागात आढळले आहेत. सिडको आणि सातपूरमध्ये संबंधित ठेकेदाराला कार्यारंभ देण्यात आले. परंतु, या भागात धूरफवारणी मात्र कागदावरच होत आहे. त्यामुळे या दोन भागात डेंग्यूचे प्रमाण वाढत असल्याचा ठपका मलेरिया विभागाने ठेवला आहे.
सिडको आणि सातपूरमध्ये ‘एस अँड आर पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस’शी झालेल्या करारनाम्यानुसार मशिनरी उपलब्ध केली नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. जूनपासून ठेकेदाराचे काम सुरू असले तरी, अटी-शर्तीनुसार ठेकेदाराने २ व्हेइकल माउन्टेड वॉशिंग मशिन, १२ हॅन्ड फॉगिंग मशिन, १०७ जीपीएस ट्रॅकिंग डिव्हाइस लावणे आवश्यक होते. ठेकेदाराने ४ जून रोजी ही मशिनरी वैद्यकीय विभागाला दाखवली. परंतु, यानंतर मशिनच गायब असल्याचे मलेरिया विभागाच्या पाहणीत आढळले आहे. तसेच याबाबत मलेरिया निरीक्षकांनी तक्रारी केल्या आहेत. ठेकेदाराचे काम कागदावरच सुरू असल्यामुळे वैद्यकीय विभागाने ठेकेदाराला नोटीस बाजवली आहे.