राज ठाकरे यांनी हिंदी भाषा सक्तीवरुन सरकारवर जोरदार बरसले

आज महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक चित्र पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि मनसेचे राज ठाकरे यांचा स्वतंत्र पक्ष असला तरी ठाकरे बंधु एकाच मंचावर आले आहेत. हिंदी सक्तीच्या विरोधात दोन्ही बंधुंचा ठाकरे बाणा पाहायला मिळत आहे. सरकारने हिंदी सक्तीचे दोन्ही शासन निर्णय रद्द केल्याने दोन्ही ठाकरे बंधुंनी मराठीचा विजय मेळावा आयोजित केला आहे. यावेळी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी हिंदी भाषा सक्तीवरुन सरकारवर जोरदार बरसले आहेत. हिंदी भाषिक राज्य आर्थिक दृष्ट्या मागास आणि न बोलणारी राज्य आर्थिकदृष्ट्या प्रगत असल्याचा बोचरा वार राज ठाकरेंनी केला.

राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र जेव्हा पेटून उठतो तेव्हा काय घडतं हे आज राज्यकर्त्यांना समजलं असेल, त्याशिवाय भाषा सक्तीवरुन माघार नाही घेतली. उत्तप्रदेश, बिहार, राजस्थान, मध्यप्रदेश कोणतं राज्य तिसरी भाषा आणणारं आहे, हे आधी सांगावं. खरंतर त्यांनीही आणली पाहिजे. पण गम्मत म्हणजे हिंदी भाषिक राज्य आर्थिक दृष्ट्या मागास आणि हिंदी न बोलणारी राज्य मात्र आर्थिकदृष्ट्या प्रगत, वर आम्ही हिंदी शिकायचं, असा टोला ठाकरेंनी लगावला.

राज ठाकरेंनी परप्रांतीयांच्या स्थलांतरावर बोट ठेवत म्हटले की, ‘हिंदीतून राज्य नाही सांभाळता आली, विकास नाही करता आला. त्या राज्यांतून नोकरी धंद्यासाठी लोक येथे येतात, मग आम्ही कोणासाठी शिकायचं हिंदी.’ तर ‘भाषा कोणतीही श्रेष्ठच असते, एक भाषा उभी करायला तपश्चर्या लागते, एक लिपी उभी करायला ताकद लागते, असेही त्यांनी नमूद केले.

अमित शहा म्हणतात, इंग्रजी जे बोलतात त्यांना पुढेपुढे लाज वाटेल त्या भाषेची, पण तुम्हाला नाही येत ना लाज. या संपूर्ण हिंद प्रांतावर १२५ वर्षे मराठ्यांनी राज्य केलं. आम्ही कोणावर मराठी लादली का, ज्या प्रांतांवर आम्ही राज्य केलं, अटोकपर्यंत मराठी साम्राज्य पोहोचलं, आम्ही लादली का? असा खडा सवालही ठाकरेंनी उपस्थित केला.