108 कुंडीय श्री गणपती महायज्ञाची तयारी अंतिम टप्प्यात!

इचलकरंजी येथील पंचगंगा नदी तीरावर आयोजित करण्यात येत असलेल्या 108 कुंडीय श्री गणपती महायज्ञाची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे. प्रवेशद्वार, यज्ञकुंड, यज्ञशाळा, झोपडी उभारण्यासाठी राजस्थानहून अनेक कारागिरांना पाचारण करण्यात आलेले आहे.

या ठिकाणी उभारलेला 51 फूट उंचीचा यज्ञकुंड पंचक्रोशीतील नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. वरदविनायक मंदिरासमोर एक ते दहा जानेवारी 2024 अखेर श्री गणपती महायज्ञाचे आयोजन केलेले आहे.

श्री पंचगंगा वरदविनायक भक्त मंडळाने व सनातन ज्ञानपीठ प्रचार समिती यांनी याचे आयोजन केले आहे. यज्ञासाठी 150 फूट बाय 150 फूट लांबी रुंदीची यज्ञशाळा देखील उभारली आहे.

या धार्मिक कार्यासाठी देशातील साधुसंत येणार असून त्यांच्यासाठी 32 झोपड्या बांधण्यात येणार आहेत. श्री 108 सितारामजी महाराज स्वतः उपस्थित राहणार असून दोन लाख भाविक महायज्ञाला भेट देणार आहेत.