या दिवशी मिळणार नाही मांसमच्छीही…. मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा!

अयोध्येमधील राम मंदिरात 22 जानेवारी रोजी रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर छत्तीसगढचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी 22 जानेवारी रोजी राज्यात ड्राय डेची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री साय यांनी एका व्हिडीओ मेसेजच्या माध्यमातून ही घोषणा केली आहे. 22 जानेवारी रोजी राज्यामध्ये दारुविक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच मांसाची विक्रीही केली जाणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे.

अयोध्येमध्ये 22 जानेवारी रोजी श्रीराम जन्मभूमी मंदिरामध्ये श्री रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या निमित्त संपूर्ण छत्तीसगढमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या दिवशी संपूर्ण राज्य एखादा उत्सव असल्याप्रमाणे जल्लोष साजरा करणार आहे. घरोघरी दिवाळी असल्याप्रमाणे दीप प्रज्वलन केलं जाईल. छत्तीसगढ सरकारने 22 जानेवारी रोजी संपूर्ण राज्यामध्ये ड्राय डे घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे,” असं साय यांनी म्हटलं आहे.

श्री रामलल्लाच्या प्रसादासाठी त्यांचं आजोळ असलेल्या छत्तीसगढमधील शेतकऱ्यांच्यावतीने भाज्यांचा पुरवठा केला जाणार आहे. या भाज्यांची खेप अयोध्येला पाठवली जाणार आहे. यापूर्वी 30 डिसेंबर रोजी राइल मिलर्सच्या मदतीने श्री रामलल्लाला भोग दाखवण्यासाठी छत्तीसगढमधून 300 मेट्रिक टन सुंगधित तांदूळ अयोध्येला पाठवण्यात आला आहे अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.