इचलकरंजी शहराला एक दिवस आड पाणी पुरवठा……

इचलकरंजी शहरात पाण्याची तीव्र टंचाई जाणवते. पाण्यासाठी सतत वणवण करावी लागते. अलीकडच्या काळात पाण्यामुळे नगरीक खूपच त्रस्त आहेत. इचलकरंजी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने पाणी उपसा पूर्ववत करण्यात आला आहे. त्यामुळे आता पंचगंगेबरोबर कृष्णेचाही उपसा सुरू झाल्याने महानगरपालिका प्रशासनाच्या पाणी पुरवठा विभागाने शहरात एक दिवस आड पाणी देण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच शहरवासियांना दिलासा मिळाला आहे.

इचलकरंजी शहराला कृष्णा नळपाणी पुरवठा योजना आणि पंचगंगा नदीतून पाणी उपसा करून शहराला पाणी पुरवठा केला जातो. इचलकरंजी शहराला दररोज ६९ एमएलडी पाणीची आवश्यकता असते. मात्र कृष्णा योजनेच्या वितरण नलिकेला लागणाऱ्या गळतीमुळे ३६ एमएलडी पाणी उपसा केला जातो. तर पंचगंगा नदी प्रदुषणामुळे दररोज ९ एमएलडी पाणी उपसा केला जातो. त्यामुळे दररोज ४५ एमएलडी इतका पाणी उपसा केला जातो. हा उपसा शहराला पाणी पुरवठा करण्यास कमी पडतो. त्यामुळे शहराला वेळीअवेळी पाणी पुरवठा केला जातो.

यंदा पाऊस कमी झाल्याने तसेच धरणात पाणीसाठा कमी असल्याने पंचगंगेचीही पातळी खालावली होती. या कारणामुळे पंचगंगा नदीतून गेल्या काही दिवसांपासून पाणी उपसा बंद करण्यात आला होता. तेव्हा नदी कायमपणे प्रवाही ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधी, तसेच महानगरपालिका प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने मागणी करण्यात आली होती. त्यानुसार पाटबंधारे विभागाने धरणातून पाणी सोडल्याने नदी प्रवाहीत होऊन पातळीत वाढ झाल्याने मंगळवारपासून पाणी उपसा सुरू करण्यात आला आहे.