इस्लामपूरात मोफत वाचनालय इमारतीचे आ. जयंत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन!


अनेकांना वाचनाची आवड ही असतेच. पण अनेक अडचणींमुळे त्यांची ही आवड पूर्णत्वास पोहचत नाही. सध्या ज्ञान हे प्रगतीचे मुख्य साधन बनलेले आहे. गावातील शाळा, वाचनालये ही गावांचा आत्मा भविष्यात जी गावे आपल्या शाळा, वाचनालये अधिक समृध्द करतील, ती अधिक गतीने प्रगती साधतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केला. भवानीनगर (ता. वाळवा) येथील जय भवानी मोफत वाचनालयाच्या नूतन इमारतीच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.

महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या अध्यक्षा सरोज पाटील (माई) अध्यक्षस्थानी होत्या. क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड, जय भवानी वाचनालयाचे अध्यक्ष व सेवानिवृत्त प्राचार्य विश्वास सायनाकर, उद्योजक सर्जेराव यादव, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनावणे, सेवानिवृत्त कर्नल अशोक
सायनाकर, सरपंच इंदुताई ताटे यांची उपस्थिती होती.

प्राचार्य सायनाकर म्हणाले, आपल्या गावात सुसज्ज वाचनालय असावे, असे माझ्या आई-वडिलांचे स्वप्न होते. ते पूर्ण करताना समाधान होत आहे. गावातील प्रत्येक घरातील मनुष्य सुसंस्कारी व सुशिक्षित व्हावा त्यासाठी हे वाचनालय मैलाचा दगड ठरेल.