अलीकडच्या काळामध्ये अनेक गावांमध्ये रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. जागोजागी खड्डे पडल्यामुळे अनेक अपघातांचे प्रमाण देखील वाढलेले आहे. तसेच अनेक गावांमध्ये बस स्थानक देखील खूपच दुरावस्थेत आलेले आहेत. दिघंची हे आटपाडी तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेले व कराड- पंढरपूर राज्यमार्गावरील प्रमुख गाव आहे.
मात्र या गावाला गेल्या पाच वर्षांपासून बसस्थानकच नाही. त्यामुळे प्रवाशांना रस्त्यावर उभे राहून बसची वाट पाहावी लागते. याबाबत ग्रामस्थांनी आंदोलन केल्यानंतर लोकप्रतिनिधींकडून या प्रश्नांची दखल घेतली व आमदार अनिल बाबर यांनी १० लाख रुपये व आमदार गोपीचंद पडळकर यांनी आंदोलन सुरू असताना २५ लाख रुपये देण्याची घोषणा केली.
त्यावेळी आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र अद्याप बस स्थानकाच्या कामाबाबत काहीही कार्यवाही झाली नाही.
सध्या दिघंची आटपाडी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यांना महाविद्यालयापासून आटपाडी एसटी स्टँडवर सवलतीचा पास काढण्यासाठी जावे लागते. त्याचबरोबर व्यापाऱ्यांची संख्या मोठी आहे. याच ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी मासिक पास व व्यापाऱ्यांसाठी पार्सल ऑफिसची सोय होणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.