सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ.

उच्च माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती (इ.५ वी व इ.८ वी) धारकांची माहिती अद्ययावत करण्याचे आदेश शिक्षण संचालकांकडून देण्यात आले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील १८५५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्याचा मार्ग यामुळे मोकळा होणार आहे.

२०१७ ते २०२१ या कालावधीतील विद्यार्थ्यांचा बँक खाते क्रमांक, आयएफएससी कोड, आधार क्रमांक या कागदपत्रांची माहिती शाळा स्तरावर संगणकीकृत करण्यात आली. परंतु, या कागदपत्रातील त्रुटीमुळे जिल्हाभरातून अनेक विद्यार्थी अनेक वर्ष शिष्यवृत्तीच्या लाभापासून दूर आहेत.

२०१७ पासून विद्यार्थ्यांची माहिती शाळा स्तरावरच संगणकीकृत करण्यात आली. परंतु यात अनेक दोष आढळून आल्याने शिष्यवृत्तीचे पैसे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा झाले नाहीत. बँकांच्या आयएफएससी कोड मध्ये ‘शून्य’ आणि ‘ओ’ यामध्ये गफलत झाल्याचे आढळून आले.

संबंधित विद्यार्थ्यांची अद्ययावत माहिती ३१ जानेवारी पूर्वी संगणकीकृत करण्याचे आदेश शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी दिले आहेत. यासोबतच २०२२ व २३ या वर्षातील माहितीही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर तातडीने भरण्याचे आदेश मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २०१७ पासूनची विद्यार्थ्यांची माहिती संगणकीकृत करणे सुरू केले. या आधारावरच सोलापूर जिल्ह्यातून १८५५ विद्यार्थी शिष्यवृत्ती पासून वंचित राहिल्याचे आढळले. राज्यभरात ही संख्या हजारोंच्या घरात आहे.

परंतु, प्राप्त माहितीनुसार जवळपास २००६ पासूनचे अनेक विद्यार्थी या लाभापासून वंचित आहेत. यावेळी संगणकीकरण न झाल्याने शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे कागदोपत्री प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे दिले गेले.यातील अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती चा लाभ मिळाला नाही. या प्रश्नावरही शिक्षण विभागाने मार्ग काढावा अशी मागणी या काळातील शिष्यवृत्तीपात्र विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.

शिष्यवृत्तीपात्र विद्यार्थी, पालकांनी आपल्या बँक खात्याची माहिती अद्ययावत करून घ्यावी. शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांना शासनाने ही संधी निर्माण करून दिली आहे. पालकांनी गटशिक्षणाधिकारी अथवा मुख्याध्यापकांकडे संपर्क साधून ३१ जानेवारी पूर्वी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. यासंबंधीच्या सूचना पंचायत समिती स्तरावर देण्यात आल्या आहेत.