महायुतीच्या जागा वाटपात परंपरेनुसार हातकणंगले लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे जातो. त्यामुळेच विद्यमान खासदार धैर्यशील माने यांची तयारी सुरू आहे. दुसरीकडे भाजपमधून राहुल आवाडे आणि राहुल महाडिक यांनी उमेदवारीसाठी दावेदारी केली आहे.
हा ‘राहू’काळ भाजप नेत्यांसमोर आता आव्हान बनून उभा आहे. तो लाभदायी ठरणार की त्रासदायी याचा अंदाज अद्याप कोणालाच नाही.
राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांत भाजपकडून चाचपणीला वेग आला आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघ शिवसेनेसाठीच आहे असे मानून विद्यमान खासदार तयारीला लागले आहेत. त्या अगोदरच कोणत्याही परिस्थितीत लोकसभेवर जाणारच, असा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी करून ऊस उत्पादकांचा लढा हाती घेतला आहे.२०२४ च्या लोकसभेला महायुतीतून धैर्यशील माने आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांची लढत होणार असल्याचे
चित्र असतानाच भाजपचे राहुल आवाडे यांनी उमेदवारी मिळण्यासाठी वरिष्ठ पातळीवर फिल्डिंग लावली आहे. इस्लामपूर-शिराळा मतदारसंघातील महाडिक गटाचे राहुल महाडिक यांनी भाजपकडून खासदारकी लढवण्याचा इशारा देऊन महायुतीत खळबळ उडवून दिली आहे.
मतदारसंघातील राजकीय पटलावर महायुतीत सध्या दोन ‘राहू’काळ समोर दिसत आहेत. त्यांना दूर करूनच शिवसेनेला जागा द्यावी लागणार आहे. दुसरीकडे महायुतीत सामील असलेल्या रयत क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी इस्लामपूर विधानसभा आणि लोकसभेसाठी तीन जागा मागितल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात हातकणंगले लोकसभा आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीमध्ये बिघाड होण्याची शक्यता आहे .
शनिवारी झालेल्या महायुतीच्या बैठकीत घटक पक्ष म्हणून इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ आणि तीन लोकसभा मतदारसंघ आमच्या संघटनेला मिळाव्यात, अशी मागणी आम्ही केली आहे. – सदाभाऊ खोत, माजी राज्यमंत्री, रयत क्रांती शेतकरी संघटनाराज्यातील विविध राजकीय घराण्यांचा अभ्यास केला तर एकाच घरात खासदार, आमदारांची पदे आहेत. त्यांची घराणेशाही चालते. नानासाहेब महाडिक यांच्या घराला काय वावडे आहे? आगामी काळात आम्ही दोघे बंधूही मैदानात उतरण्यासाठी मागे-पुढे पाहणार नाही. – राहुल महाडिक, संचालक, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देताना उमेदवाराचे मेरिट बघावे. या परीक्षेत आपणच आघाडी घेऊ. म्हणूनच भाजपकडून उमेदवारी मिळण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. – राहुल आवाडे, माजी जि.प. सदस्य