सक्रांतीनंतर तांदूळ, तूरडाळ महागणार!

हिट ॲण्ड रन” कायद्याच्या विरोधात ट्रक चालकांनी पुकारलेल्या संपाचा फटका बाजारात जाणवत नसल्याने धान्यांची आवक सुरळीत सुरू आहे. परंतु, बाजारात ग्राहकांची वर्दळ कमी असल्याने खरेदी मंदावलेली आहे.

सक्रांतीनंतर बाजारात वर्षभरासाठी नवीन तांदूळ खरेदीसह तूरडाळीच्या खरेदीला वेग येण्याची शक्यता आहे. दोन्ही उत्पादनांना पावसाचा फटका बसल्याने दरात तेजीचे संकेत आहेत. खाद्य तेलाचे दर मात्र, गेल्या महिनाभरापासून स्थिरावलेले आहेत.

यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने खरिपातील अनेक पिकांवर परिणाम दिसून आला. यात भात पिकावरही मोठा परिणाम झाला. इतर वर्षांच्या तुलनेत भाताचे उत्पादन कमी झाले. त्यातच तांदळाच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले. केंद्र सरकारने जुलै २०२३ मध्ये बिगर बासमती तांदळावर निर्यातबंदी आणली.

वाढत्या दराने अनेक देशांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. जगातील अनेक देश तांदळासाठी भारतावर निर्भर आहेत. केंद्र सरकारने तांदळाची निर्यात बंद केल्याने अनेक देशांमध्ये तांदळाचा तुटवडा भासत असल्याने किमती वाढल्याचे चित्र आहे.