काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता करताना पाहायला मिळाले होते. मुख्यमंत्र्यांनी आपला मोर्चा आता राज्यातील धार्मिक स्थळांकडे वळवला आहे. राज्यातील सर्व धार्मिक स्थळांना लाखोच्या संख्येने भाविक भेट देत असतात.
भाविकांचे श्रद्धास्थान असणारे ही ठिकाणे स्वच्छ आणि सुंदर राहिली पाहिजेत. त्यासाठी या धार्मिक स्थळांच्या स्वच्छतेसाठी कायमस्वरुपी योजना राबविण्याची आणि यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्यातील धार्मिक स्थळांवरील इमारतींची स्वच्छता संबधित ट्रस्टमार्फत होत असते. परंतू बाहेरील भागात अस्वच्छता कायम राहते. यामुळे भाविकांना त्रास होत असतो. याची गंभीर दखल घेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी धार्मिक स्थळांना स्वच्छ आणि सुंदर बनविण्याचे आवाहन केले.
या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यात तातडीने जिल्हाधिकारी यांच्या पुढाकारातून धार्मिक स्थळांची स्वच्छता मोहिम राबवावी. तसेच मंदिर परिसरात विशेष स्वच्छता मोहिम राबवून विद्युत रोषणाई करण्यात यावी. आठवडाभरात हा बदल दिसायला हवा.
तसेच धार्मिक स्थळांवर कायमस्वरुपी स्वच्छता राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून विशेष योजना तयार करण्याच्या आणि या योजनेला जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या. या योजनेसाठी महसूल विभागाच्या माध्यमातून नोडल अधिकारी नेमून राज्यस्तरावरुन लक्ष ठेवावे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.