कोल्हापूरातील साखर कारखान्यांसमोर कर्जाचा डोंगर

ऊस गळीत हंगाम तोंडावर आलेला दुसरीकडे शेतकरी संघटनांनी एफआरपी पेक्षा अधिक रकमेसाठी आंदोलनाला सुरुवात केली असताना आगामी हंगामाच्या तोंडावर कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना कर्जाचा डोंगर कसा दूर करायचा याची चिंता सतावत आहे. सप्टेंबर सरताना झालेल्या वार्षिक सभांमध्ये कारखान्यांवरील कर्जाच्या मुद्द्यवरून सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी कोंडीत पकडले. आर्थिक अडचणी पाहता जिल्ह्यातील भोगावती, कुंभी, आजरा, गडहिंग्लज आदी कारखान्यांना आर्थिक संकट निवारणाचे आव्हान पेलावे लागणार असून यामध्ये राजकीय नेतृत्वाचा कस लागणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने अर्थक्षम म्हणून ओळखले जातात. जिल्ह्यातील कारखान्यांचा उसाचा दर राज्यात चांगला असतो. अर्थक्षम कारखाने उसाची बिले , अन्य देणी वेळेवर देण्या बाबतीत तत्पर असतात. तरीही आता शेतकरी संघटनांनी गेल्या वर्षीच्या गाळप झालेल्या उसाला प्रतिटन ४०० रुपये मिळावेत यासाठी आंदोलन सुरू केले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यासाठी आज सोमवारपासून साखर कारखान्यासमोर ढोल वादन आंदोलन सुरू केले आहे. तर उद्यापासून साखर कारखान्यांची साखर अडवण्याचे आंदोलन हाती घेतले जाणार आहे. अन्य संघटनाही आंदोलना मध्ये उतरत आहेत.