ऑनलाईन कर्जाच्या विळख्यात अडकतेय तरुणाई परतफेडीनंतरही ब्लॅकमेलिंग

ऑनलाईन कर्ज देताना कमीत कमी कागदपत्रे घेऊन अॅप्लिकेशन डाउनलोड करायला लावून तरुणांना जाळ्यात ओढण्याचे प्रकार सुरू आहेत. ऑनलाईन कर्जाची परतफेड करूनही अनेक तरुणांना ब्लॅकमेलिंग केले जात आहे. शिवाय वैयक्तिक व सार्वजनिक माहिती मिळवून त्या आधारे तरुणांची बदनामी करण्याचे प्रकार शहरात सुरू आहेत.

आतापर्यंत यात अनेक तरुणांना त्रास सोसावा लागला आहे. मोबाईलवर कर्ज देणाऱ्या काही बोगस कंपन्या सतत मेसेज पाठवून कर्ज घेण्याचा तगादा लावतात. सहज कर्ज मिळत असल्याने खास करून तरुण याला बळी पडत आहेत; मात्र कर्ज घेतल्यापासून खऱ्या अर्थाने ब्लॅकमेलिंगचा धंदा सुरू होतो. बदनामीच्या भीतीने कर्जाच्या रकमेपक्षा अधिक पैसे देऊनही तरुण हा अन्याय सोसत आहेत. त्यामुळे शहरातील काही कुटुंबे दहशतीखाली आहेत. ऑनलाईन कर्ज घेण्याआधी फ्रॉडसकडून अॅप्लिकेशन डाउनलोड करायला सांगून मोबाईलमधील अॅक्सेसवर ताबा मिळवला जातो.

कर्ज मिळाल्यानंतर काही कालावधीत व्याजासह कर्जाची परतफेड करूनही वसुलीचा तगादा लावला जातो. गॅलरी व कॉन्टॅक्ट लिस्टमधील क्रमांकावर आक्षेपार्ह पोस्ट पाठवून वेठीस धरले जाते. फोटो गॅलरीचा ब्लॅकमेलिंगसाठी वापर करून सायबर चोरट्यांकडून मानसिक त्रास दिला जात असल्याचा प्रकार शहरातील काही तरुणांच्या बाबतीत घडला आहे. हे प्रकार थांबवण्यासाठी अवास्तव पैशाची मागणी केली जाते. परराज्यात बसून हा धंदा सुरू आहे.

त्यामुळे कोणी सहज कर्ज देण्याचे आमिष दाखवत असेल तर त्यावर विश्वास ठेवू नये अन्यथा फसवणुकीचा हा फास आणखी घट्ट होणार आहे. शहरातील काही तरुणांनी हा त्रास सहन केला आहे. केवळ बदनामीच्या भीतीने फसलेले तरुण पोलिसांत जाण्याचे धाडस करत नसल्याने फसवणाऱ्यांना बळ मिळत आहे. वेळीच याबाबत पोलिसांत धाव घेतल्यास भविष्यात अनेकांची फसगत टळू शकते.