राज्यात अजून किती दिवस असणार थंडी……

मकर संक्रांतीच्या दिवसापासून संपूर्ण राज्य गारठण्यास सुरुवात झाली आहे. पुणे, मुंबईसह राज्यातील अनेक शहरांचा  पाराउतरला आहे. राज्यात सर्वात ‘हॉट सिटी’ म्हणून ओळख असणाऱ्या जळगाव शहराचा पारा सर्वाधिक घसरला आहे. जळगाव राज्यातील ‘कोल्ड सिटी’ झाले आहे. सोमवारी राज्यात जळगावचा पारा सर्वात नीचांकी 9.9 अंशांपर्यंत नोंदवण्यात आला. छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नगर व पुणे शहराचा पाराही 10 ते 12 अंशांवर दरम्यान होता. संक्रांतीच्या दिवशी उत्तरायण सुरू होताच तापमानात वाढ होण्याऐवजी सायंकाळनंतर तापमान घसरणे सुरु झाले आहे. राज्यात आणखी तीन दिवस थंडी राहणार असल्याचा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

देशात यंदा मान्सून कमी झाला. अनेक राज्यात पावसाने सरासरी गाठली नाही. त्यानंतर राज्यात यंदा थंडी पडली नाही. यामुळे त्याचा परिणाम रब्बी पिकांवर होणार आहे. परंतु आता जाता जाता थंडी पडू लागली आहे. मिनी कश्मीर अशी ओळख असणाऱ्या महाबळेश्वरच्या तापमानाचा पारा कमी झाला आहे. लिंगमळा परिसरात गवतावर काही प्रमाणात दवबिंदू गोठले आहे. तापमानाचा पारा 10 अंशाच्या खाली आला आहे. अचानक हवामानात बदल झाल्यामुळे महाबळेश्वरमध्ये थंडीत वाढ झाली आहे. त्यामुळे पर्यटकांनाही फायदा होत आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुंबईसह उपनगरात तसेच राज्यभरात थंडीचा कडाका वाढला आहे. मुंबईत पारा तब्बल ४ अंश सेल्सियसने घसरला आहे. धुक्यामुळे प्रदूषणातही वाढ झाली आहे. आधीच थंडी त्यात प्रदूषण यामुळे दवाखाने, रुग्णालयांच्या ओपीडीत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. घसा खवखवणे, सर्दी, खोकला अशा तक्रारी घेऊन रुग्ण रुग्णालयात गर्दी होत आहे.दोन ते तीन दिवस थंडी कायम राहण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.