मुंबईतील भांडुप येथे भर पावसात हेडफोन घालून प्रवास करणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं. भांडुपच्या पन्नालाल कंपाऊंड परिसरात दीपक पिल्ले (वय 17) या तरुणाचा हाय टेन्शन वायरचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना काल सायंकाळी एल.बी.एस. मार्गावर घडली. दीपक हा पावसात घरी परतत असताना रस्त्यालगत पडलेल्या महावितरणच्या उघड्या वायरचा त्याच्या पायाशी संपर्क आला. शॉक इतका तीव्र होता की, काही क्षणातच दीपक कोसळला.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक हेडफोन (Headphone) घालून जात होता. आसपासच्या नागरिकांनी त्याला धोक्याची सूचना देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने ऐकू न आल्याने तो वायरच्या संपर्कात आला.
महत्त्वाचे म्हणजे येथील नागरिकांनी या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या अनेक जणांना सूचना करून येथून बाजूला जाण्यास सांगितलं होतं त्यामुळे अनेक नागरिकांचे प्राण येथील स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे वाचले आहेत. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे काही नागरिकांचे जीव वाचले. पण दीपकला वाचवता आले नाही. त्याच्या कानात हेडफोन होता. त्याला नागरिकांनी हाका मारल्या. त्याला आवाज दिला. पण हेडफोन लालेले असल्याने त्याला नागरिकांचा आवाज ऐकू आला नाही आणि वीजेच्या तारेच्या संपर्कात आल्याने शॉक लागून त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांना तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तर महावितरणला पण याची नागिरकांनी सूचना केली. पावसाळ्यात अशा उघड्या तारा अनेकांसाठी प्राणघातक ठरत आहे. महावितरणने तात्काळ याबाबत माहिती घ्यायला हवी होती. हलगर्जीपणामुळे एका तरुणाला जीव गमावावा लागल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे. तर रस्त्यावरून जाताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. हेडफोनपेक्षा प्राण महत्त्वाचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विद्युत तारा अथवा लोखंडी विद्युत खांबाला पावसात हात न लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर या दीपकच्या कुटुंबाला या घटनेने धक्का बसला आहे. दीपक काही वेळेपूर्वीच घरातून बाहेर पडला होता. त्याच्या मृत्यूची बातमी कळताच त्याच्या घरच्यांना धक्का बसला.
