कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्हीही जागा शिंदे गटालाच असतील, अशी घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केली असली तरी त्याचा अंतिम निर्णय हा दिल्लीतूनच होणार आहे.
लोकसभेची निवडणूक भाजपच्यादृष्टीने प्रतिष्ठेची आहे, त्यामुळे एका-एका जागेवरील विजयाची आखणी करताना अनेक बाजूंनी विचार केला जाणार आहे. त्यामुळे जागा कोणाला मिळणार यापेक्षा विद्यमान खासदारांना उमेदवारी मिळवणे हेच मोठे आव्हान असेल. महायुतीच्या झालेल्या मेळाव्यानंतर मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील दोन्ही जागा शिंदे गटाला असतील असे जाहीर केले.
प्रत्यक्षात याच नव्हे तर राज्यातील कोणत्याही जागेबाबत महायुतीचा निर्णय झालेला नाही. या निर्णय प्रक्रियेत कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) किती महत्त्व असेल हे सांगता येणार नाही. दुसरीकडे जागा जरी शिंदे गटालाच मिळाल्या तरी उमेदवारी विद्यमान खासदारांनाच मिळेल का नाही याविषयीही संभ्रमावस्था आहे.
पालकमंत्री मुश्रीफ यांच्यादृष्टीने कागलचे राजकारण महत्त्वाचे आहे. त्यातून त्यांच्याकडून वारंवार माजी आमदार संजय घाटगे यांच्याशी असलेल्या मैत्रीचा उल्लेख केला जात आहे. आमच्या मैत्रीला दृष्ट लागू नये, असे ते म्हणतात, पण याच संजय घाटगे यांचे प्रा. मंडलिक यांच्याशी तालुक्याच्या राजकारणात मतभेद आहेत.
दुसरीकडे घाटगे हे लोकसभेसाठी महाविकास आघाडीतील शिवसेनेकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असताना मुश्रीफ यांनी दोन्ही जागा शिंदे गटाला मिळतील, असे सांगितले आहे.
