रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेची तारीख आता अगदी जवळ आली आहे. यामुळे अयोध्येमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम आखले जात आहेत. अयोध्या नगरी ही प्रभू श्रीरामांच्या स्वागतासाठी सज्ज होत आहे.यासाठी देशभरातून कित्येक लोक अयोध्येत पोहोचले आहेत. सांगलीमधील एक रांगोळी कलाकार देखील अयोध्येतील रस्ते सुशोभित करण्यासाठी मदत करत आहे.
सांगलीतील शिराळा तालुक्यातील सुनिल कुंभार हे सध्या अयोध्येतील लता मंगेशकर चौकातील रस्त्यांवर रांगोळी काढत आहेत. एका किटलीला खाली छिद्र पाडून, अगदी अनोख्या पद्धतीने ते रस्त्याच्या कडेला आकर्षक डिझाईन काढत आहेत.
त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. सुनिल यांनी सांगितलं, की ते गेल्या 30 वर्षांपासून रांगोळी काढण्याचं काम करत आहेत. आपली कला प्रभू श्रीरामाच्या चरणी अर्पण करण्यासाठी म्हणून ते अयोध्येत आले आहेत.
ते आपल्यासोबत तब्बल एक हजार किलो रांगोळी घेऊन गेले आहेत. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांमधील 25 शहरांमध्ये रांगोळीच्या माध्यमातून लोकांचे प्रबोधन करत ते अयोध्येला पोहोचले आहेत.