रेल्वेचे आरक्षित तिकीट मिळवणे एक दिव्यच असते. लांब पल्याच्या प्रवासाचे तिकीट तीन महिन्यांपूर्वी तिकीट विंडो सुरु होताच संपतात. तसेच तत्काळ तिकीट एका मिनिटांत संपतात. यामध्ये दलालांची भूमिका महत्वाची असते. भारतीय रेल्वेने दलालांना रोखण्यासाठी अनेक उपाय केल्यानंतर यश आले नाही. आता रेल्वेने दलांना रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर सुरु केला आहे. देशात प्रथमच आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय दलालांना रोखण्यात येणार आहे. त्याची सुरुवात पुणे आरक्षण केंद्रावरुन सुरु झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांना आरक्षण मिळणे सोपे होणार आहे.
पुणे रेल्वे स्थानकावर जिओ कंपनीकडून एआय असलेले चार कॅमेरे बसवण्यात आले आहे. आरक्षित तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी रेल्वेने हे पाऊल उचलले आहे. यासाठी यंत्रणेत १०० दलालांचे फोटो अपलोड केले आहे. आरक्षण केंद्रातील खिडक्यांवर आणि परिसरात बसवलेल्या एआय कॅमेऱ्याद्वारे तिकीट काढण्यासाठी आलेल्या रांगेतील व्यक्तींवर नजर ठेवली जाईल. त्या व्यक्तीचे चित्रिकरण करुन रेकॉर्डिंग होणार आहे. दलाल किंवा अन्य संशयित व्यक्ती आरक्षण केंद्रावर आल्यास त्याचा अलर्ट आरक्षण केंद्र प्रमुखाला जाईल. यामुळे दलालच नाही तर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्ती या परिसरात फिरु शकणार नाही.