मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे अमरण उपोषणाला बसले आहेत. कालपासून (10 फेब्रुवारी) मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटीमध्ये आपलं उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी होणार नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका जरांगे यांनी घेतली आहे. विशेष म्हणजे आत्तापर्यंतचे सर्वात कठोर उपोषण करणार असल्याचे देखील जरांगे यांनी म्हटले आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंनी आंतरवाली सराटी ते मुंबई असा आंदोलन केले. आंदोलन वाशीला पोहोचताच सरकारने मराठा आरक्षणाबाबत सगेसोयरेचा अध्यादेश काढला. तसेच, पुढील पंधरा दिवसात या अध्यादेशाची अंमलबजावणी होणार असल्याचे देखील सरकारकडून सांगण्यात आल्याचे मनोज जरांगे म्हणाले होते. मात्र 9 फेब्रुवारीला सरकारची मुदत संपली असून, या अध्यादेशाची अजूनही अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप जरांगे यांच्याकडून करण्यात आला आहे. आता याच मागणीसाठी जरांगे चौथ्यांदा आंतरवाली सराटीमध्ये अमरण उपोषण करत आहे.
सगेसोयरे अध्यादेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी 10 फेब्रुवारीपासून मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा अमरण उपोषण सुरू केले आहे. मात्र या उपोषणादरम्यान आपण ना पाणी पिणार आहोत, ना कोणते उपचार घेणार आहोत अशी भूमिका जरांगे यांनी घेतली आहे. तर, दुसरीकडे अंबडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी जरांगे यांची भेट घेऊन उपचार घेण्याची विनंती केली आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाची ही विनंती जरांगे यांनी धुडकावून लावत, आपण कठोर उपोषण करणारच अशी भूमिका घेतली आहे.