E Peek Pahani : शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणी करण्यास आज शेवटचा दिवस

१ डिसेंबरपासून ई-पीक पाहणी सुरू झाली आहे. पीकविमा, हमीभाव केंद्रावर शेतमाल विक्रीसाठी ई-पीकपाहणी आवश्यक असून, शेतकरी स्तरावरील नोंदणीस अवधा एक दिवस उरला आहे. नुकसानभरपाई मिळण्यासाठी बंधनकारक आहे.ई-पीक पाहणी यंदाच्या रब्बी हंगामापासून ई-पीक पाहणी नोंदीसाठी डिजिटल क्रॉप सर्व्हे (डीसीएस) मोबाइल अॅपच्या माध्यमातून शेतकरी व सहायक स्तरावरून पिकांची नोंद केली जाणार आहे.

सध्या शेतकरी स्तरावरून ई-पीक पाहणी केली जात आहे. शेतकरी स्तरावरून नोंदणीसाठी १५ जानेवारीपर्यंतची मुदत आहे. यात शेतकऱ्यांना शेतात जाऊनच मोबाइल अॅपमध्ये पिकांचे फोटो अपलोड करून माहिती भरावी लागत आहे.

ई-पीक पाहणी करताना शेतकऱ्यांना अडचण आल्यास मदतीसाठी सहायकांची नियुक्ती केली आहे. शेतकरी स्तरावरील ई- पीक पाहणी कालावधी संपल्यानंतर उर्वरित खातेदारांची ई-पीकपाहणी कर्मचाऱ्यांमार्फत डीसीएस मोबाइलद्वारे त्यांच्या लॉगिनने पूर्ण करणार आहेत.

गाव नमुना १२ वर होईल नोंद

  • शेतकरी स्तरावरून नोंदवण्यात आलेल्या पीक नोंदीपैकी १०० टक्के पडताळणी सहायक स्तरावरून करण्यात येणार आहे.
  • सहायक स्तरावरून नोंदविण्यात आलेल्या नोंदीची १०० टक्के पडताळणी ग्राम महसूल अधिकारी यांच्यामार्फत होणार आहे.
  • त्यानंतर ई-पीक पाहणी गाव नमुना १२ वर प्रतिबिंबित करण्यात येईल.