IPL सोडा आधी रणजी खेळा! या खेळाडूंना……

आपल्यापैकी बरेचजण क्रिकेटचे प्रेमी आहेत. IPL ची अगदी ते आतुरतेने वाट पाहत आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेटीम इंडियाच्या (Team India) अनेक खेळाडूंना हातवारे करुन कठोर संदेश दिला आहे. आयपीएल (IPL 2024) सुरू होण्याची वाट पाहणाऱ्या स्टार खेळाडूंना बीसीसीआयनं फटकारलं आहे. बीसीसीआयनं एक नियम बदलत सर्व स्टार खेळाडूंना चांगलीच तंबी दिली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून टीम इंडियाकडून खेळणाऱ्या अनेक खेळाडूंकडून रणजी क्रिकेटकडे कानाडोळा होत असल्याचं बीसीसीआयच्या लक्षात आलं होतं. यावर चाप बसवण्यासाठीच बीसीसीआयनं हा कठोर निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. बीसीसीआय आणि राष्ट्रीय निवड समितीनं खेळाडूंना शिस्त लावण्याच्या दृष्टीकोनातून कठोर पावलं उचलली आहेत. सोमवारी अनेक खेळाडूंच्या ईमेलवर बीसीसीआयचे मेल आले असून त्यांना मेलमधून रणजी ट्रॉफीमध्ये खेळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, सध्या जे खेळाडू भारतीय क्रिकेट संघाचा भाग नाहीत आणि त्यासोबतच जे खेळाडू बंगळुरूमध्ये नॅशनल क्रिकेट अॅकॅडमीत (NCA) मध्ये रिहॅब होत असलेल्या सर्व खेळाडूंना हा नियम लागू होत असल्याचं बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 

जे खेळाडू सध्या टीम इंडियाचा भाग नाहीत, अशा सर्व खेळाडूंनी 16 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफीच्या पुढच्या फेरीसाठी आपापल्या राज्यांच्या संघांमध्ये सहभागी होणं अनिर्वाय आहे. याबाबत बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, खेळाडू केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट किंवा आयपीएलला प्राथमिकता देऊ शकत नाहीत, त्यांना देशांतर्गत क्रिकेटही खेळणं अनिर्वाय असणार आहे. 

स्पर्धात्मक क्रिकेट सोडून आयपीएलला प्राधान्य देणाऱ्या ईशान किशनसारख्या खेळाडूंवर या नियमाच्या अंमलबजावणीचा परिणाम होईल. क्रिकबझच्या रिपोर्टमधून अला दावा करण्यात आला आहे की, सध्या ईशान किशन आयपीएलसाठी बडोद्यात प्रशिक्षण घेत आहे. तर त्याचा राज्य संघ झारखंड येत्या काळात जमशेदपूरमध्ये राजस्थानविरुद्धचा सामना खेळायचा आहे. त्यामुळे येत्या काळात ईशान किशन राजस्थानविरोधात खेळताना दिसणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बीसीसीआयच्या निर्णयाचा फटका केवळ ईशान किशनलाच नाहीतर इतरही खेळाडूंना बसणार आहे. कृणाल पांड्या, दीपक चाहर यांसारख्या इतर खेळाडूंसाठीही हा निर्णय डोक्याला ताप देणारा ठरणार आहे. श्रेयस अय्यरला त्याच्या खराब फॉर्मामुळे राष्ट्रीय संघातून वगळण्यात आलं आहे. त्यामुळे येत्या काळात श्रेयस अय्यरही देशांतर्गत क्रिकेट खेळताना दिसणार आहे.