भारत आणि पाकिस्तान यांच्यात आयसीसीच्या स्पर्धांमध्येच सामने होत आहेत. दोन्ही देशांचे संबंध बिघडलेले असल्यानं दोन्ही संघांमधील क्रिकेटच्या मालिका बंद आहेत. यामुळं क्रिकेट चाहत्यांना आयसीसीच्या स्पर्धांमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅच पाहायला मिळते. आयसीसी टी20 वर्ल्ड कप 1 जूनपासून सुरु होणार आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेनं टी-20 वर्ल्ड कपचं आयोजन केलं आहे.
भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना 9 जूनला होणार आहे. या मॅचसंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका रिपोर्टनुसार भारत आणि पाकिस्तान मॅचवर दहशवादी हल्ल्याची भीती आहे. मात्र, यासंदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही. एका रिपोर्टनुसार ही धमकी इसिसकडून देण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तान मॅचसाठी पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था बळकट केली आहे.
मात्र, दहशवादी हल्ल्याच्या धमकीच्या बातमीनं चिंता वाढली आहे. मीडिया रिपोर्टनुसार इसिसकडून हल्ल्याबाबत माहिती देण्यात आलीय. याबाबत एक व्हिडीओ जारी करण्यात आला आहे. त्या व्हिडीओत हल्लेखोरांनी भारत आणि पाकिस्तान मॅचमध्ये व्यत्यय आणण्याचा इशारा दिला आहे. या प्रकरणी नासाऊ काऊंटीचे पोलीस अधिकारी पॅट्रिक राइडर यांनी धमकीला दुजोरा दिला आहे. यासह त्यांनी सुरक्षा व्यवस्थेबद्दल देखील भाष्य केलं.
न्यूयॉर्कच्या गव्हर्नर कैथी होचुल यांनी देखील भारत आणि पाकिस्तान मॅचसंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन सुरक्षेबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा झाली असून सुरक्षेबाबत एकत्रित काम सुरु असल्याचं म्हटलं. क्रिकेट वर्ल्ड कपच्या तयारीत टीम फेडरल आणि कायदा अधिकारी एकत्र येत काम करत आहेत, असं म्हटलं. मॅचमध्ये उपस्थित असणऱ्या सर्वांच्या सुरक्षेवर लक्ष ठेवलं जाईल, असं म्हटलं.