भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात नाणेफेक गमावली असून प्रथम गोलंदाजी करत आहे. भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज शुभमन गिल विश्वचषक २०२३ च्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात खेळत नाहीये. फलंदाजीत अप्रतिम असण्यासोबतच गिल एक उत्कृष्ट स्लिप क्षेत्ररक्षक देखील आहे. टीम इंडियाला फलंदाजीत गिलची उणीव भासत असेल पण क्षेत्ररक्षणातविराट त्याच्या वाटणीची कामगिरीही चोख बाजवताना दिसला. तिसऱ्याच षटकात विराट कोहलीने स्लिपमध्ये अप्रतिम झेल घेत ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर मिचेल मार्शला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले.
ऑस्ट्रेलियासाठी मिचेल मार्श उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याने चांगली फलंदाजी केली. मात्र विश्वचषकातील पहिल्या सामन्यात त्याला खातेही उघडता आले नव्हते. जसप्रीत बुमराहने तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला. चेंडू उसळला आणि मार्शच्या बॅटची बाहेरची कड घेत स्लिपच्या दिशेने नेली. विराट कोहलीने डावीकडे उडी मारून चेंडू पकडला.
या झेलसह विराट कोहली विश्वचषकातील भारताचा सर्वात यशस्वी क्षेत्ररक्षक बनला आहे. चौथा विश्वचषक खेळत असलेल्या विराटचा हा १५वा झेल होता. सर्वाधिक झेल घेण्याच्या बाबतीत त्याने अनिल कुंबळेंना मागे सोडले. माजी लेगस्पिनर अनिल कुंबळेंनी वर्ल्ड कपमध्ये भारताकडून १४ झेल घेतले आहेत. कपिल देव आणि सचिन तेंडुलकर यांनी क्षेत्ररक्षक म्हणून प्रत्येकी १२ झेल घेतले आहेत.