‘बुमराहला पुढच्या 2 मॅच खेळवू नका’, गावसकरांंचा टीम इंडियाला सल्ला

भारत विरुद्ध ओमान यांच्यात आशिया कप 2025 चा ग्रुप स्टेजमधील शेवटचा सामना शुक्रवार 19 सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. अबूधाबीच्या शेख जायद स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार असून हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरु होईल. टीम इंडिया आधीच पाकिस्तान आणि यूएईला हरवून आशिया कप 2025 च्या सुपर 4 साठी क्वालिफाय झालीये. त्यांना सुपर 4 मधला पहिलाच सामना हा पाकिस्तान विरुद्ध रविवार 21 सप्टेंबर रोजी खेळायचाय. मात्र यापूर्वी भारताचे माजी क्रिकेटर सुनील गावसकर यांनी जसप्रीत बुमराहबाबत एक मोठं विधान केलंय, ज्यामुळे अनेकजण हैराण झालेत.

भारताचे माजी क्रिकेटर सुनील गावसकर यांनी टीम मॅनेजमेंटला सल्ला दिला की वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला आशिया कपमधील पुढील दोन सामन्यात आराम देण्यात यावा, त्याला प्लेईंग 11 मधून बाहेर ठेवण्यात यावं. सुनील गावसकरने हे सुचवलं की गोलंदाज जसप्रीत बुमराहला केवळ ओमान विरुद्ध अंतिम ग्रुप-स्टेज सामन्यातच नाही तर पाकिस्तान विरुद्ध 21 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सामन्यात सुद्धा प्लेईंग 11 मध्ये संधी देऊ नये. आशिया कप 2025 च्या प्रसारकांशी बोलताना सुनील गावसकर यांनी हे विधान केलं आहे.

माजी क्रिकेटर सुनील गावसकर यांनी सांगितलं की, ‘ओमान विरुद्ध सामन्यात भारताला आपल्या लाईनअपमध्ये छोटे छोटे बदल करावे लागतील. यामुळे संघाला त्यांची बेंच स्ट्रेंथ चाचणी घेण्याची संधी मिळू शकते आणि संजू सॅमसन, तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्या यांना क्रीजवर काही वेळ घालवता येईल. सुनील गावस्कर म्हणाले की, जसप्रीत बुमराहला विश्रांती दिल्याने तो पुढील अधिक आव्हानात्मक सुपर 4 सामन्यांसाठी ताजातवाना राहील.

सुनील गावसकरने पुढे म्हटले की, ‘मला वाटतं बुमराहला आराम द्यायला पाहिजे. कदाचित पाकिस्तान विरुद्ध सामन्यात सुद्धा, जेणेकरून तो श्रीलंका विरुद्ध होणाऱ्या आणि पुढील सुपर 4 च्या मोठ्या सामन्यांसाठी उपलब्ध असेल. भारताला यावर लक्ष द्यायला हवं. त्यांना बेंचवर बसलेल्या एका खेळाडूला संधी द्यायला हवी. पण बुमराहला पुढील दोन सामन्यांसाठी आराम द्यायला हवा’. जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली तर त्याच्या जागी अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांची निवड होण्याची शक्यता आहे.