काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे काँग्रेसचा हात सोडून भाजपावासी झाले आहेत. वर्षभरापासून चव्हाण भाजपात जाण्याच्या चर्चा सुरू होत्या. पण अखेरीस त्यांनी 13 फेब्रुवारीला भाजपात प्रवेश केला आहे.
यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे ती लातूरचे काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांच्या भाजपा प्रवेशाबाबतची. कारण काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातूर जिल्ह्याबाबत आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
दिवंगत विलासराव देशमुख यांच्यानंतर त्यांचे दोन्ही चिरंजीव अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांनी लातूरमध्ये आपले आणि काँग्रेस पक्षाचे वर्चस्व कायम ठेवले आहे. परंतु, ईडी आणि सीबीआयच्या भीतीमुळे देशमुख बंधूही भाजपात जाण्याचा निर्णय घेऊ शकतात, अशी चर्चा रंगलेली आहे.