शेतकरी संघटना आक्रमक! आज ‘काळा दिवस’ पाळणार

शेतमालाला हमीभाव मिळावा यासह विविध मागण्यांसाठी गेल्या ४ दिवसांपासून शंभू बॉर्डरवर ठिय्या मांडून बसलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी बुधवारी (२१ फेब्रुवारी) अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. इतकंच नाही, तर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी रबरी गोळ्या देखील झाडल्या. यावेळी एका तरुण शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. शुभकरन सिंग (वय २२) असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे.

शुभकरन याच्या मृत्युनंतर शेतकरी संघटना आणखीच आक्रमक झाल्या आहेत. या घटनेच्या निषेधार्थ २३ फेब्रुवारी हा दिवस देशभरात काळा दिवस म्हणून पाळण्यात येणार, असं शेतकरी नेत्यांनी सांगितलं आहे. याशिवाय येत्या १४ मार्च रोजी रामलीला मैदानावर आंदोलन देखील करण्यात येणार, अशी घोषणा किसान मोर्चाने केली आहे.

तरुण शेतकऱ्याच्या मृत्युनंतर शेतकरी संघटनांनी ‘दिल्ली चलो’ आंदोलनास तूर्त ब्रेक लावला आहे. दरम्यान, शुभकरनच्या मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी नेते सरवनसिंग पंधेर यांनी केली आहे. 

याशिवाय शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर आणि ट्रॉल्यांचं नुकसान केल्याप्रकरणी निमलष्करी दलाच्या कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात यावी, असंही त्यांनी म्हटलं आहे. हरियाणा सुरक्षा दलाचे कर्मचारी हे पंजाबच्या हद्दीमध्ये प्रवेश करत असून खानौरी सीमेवर त्यांच्याकडून दडपशाही सुरू आहे, असा आरोपही पंधेर यांनी केला आहे.

शुभकरनसिंगला हुतात्म्याचा दर्जा बहाल करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी नेते जगजितसिंग डल्लेवाल यांनी केली आहे. दरम्यान, शुभकरनसिंगच्या निधनावर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शोक व्यक्त केला आहे. या शेतकऱ्याच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे मान यांनी स्पष्ट केले.