सोलापूर जिल्ह्यातील ‘शासन आपल्या दारी’ पुन्हा लांबणीवर

लोकसभेच्या तयारीला प्रत्येक पक्ष लागलेला आहे. मोर्चेबांधणी तसेच दौरे सुरु आहेत. शासन आपल्या दारी’चा सोलापूर जिल्ह्यातील कार्यक्रम आता दुसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आला आहे. फेब्रुवारी २०२३मध्ये पंढरपुरात हा कार्यक्रम नियोजित होता, पण त्यावेळी तो झाला नाही. आता लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी हा कार्यक्रम घेण्याची घाई सरकार पातळीवरून सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यादृष्टीने सर्वच विभागांना पंढरपूरला येणाऱ्या लाभार्थींची यादी निश्चित करण्याचे आदेश दिले. पण, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या तारखा उपलब्ध नसल्याने हा कार्यक्रम पुन्हा लांबणीवर पडला असून लाभार्थींना आणखी काही दिवसांची वाट पाहावी लागणार आहे.

आता लोकसभेची आचारसंहिता मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल म्हणून २७ ते २९ फेब्रुवारी दरम्यान हा कार्यक्रम नियोजित होता. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कार्यक्रमाच्या तयारीसाठी सर्वच विभागप्रमुखांची बैठक देखील घेतली. पण, आता हा कार्यक्रम पुन्हा लांबणीवर पडला असून तो कधी होईल हे निश्चित नसल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.