कोल्हापूर शहराची जगभर ख्याती आहेच. अनेक विदेशी यात्री कोल्हापूर शहराला भेट देत असतात. अनेक भव्यदिव्य कार्यक्रम देखील कोल्हापूर शहरात आयोजित केले जातात. तर राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने उद्या, शनिवार, दि. २४ फेब्रुवारी रोजी खासबाग केसरी बेमुदत निकाली कुस्त्यांचे मैदान होणार असल्याची माहिती पैलवान संग्राम कांबळे आणि अभिनेते विराट मडके यांनी दिली. महाराष्ट्र केसरी विजेत्या मल्लाला चांदीची गदा आणि रोख बक्षीस देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी बारामती कुस्ती केंद्राचा भारत मदने यांच्यात प्रथम क्रमांकाची कुस्ती होणार आहे. या मैदानात महाराष्ट्र चॅम्पियन सेनादलाचा संग्राम पाटील आणि शाहू आखाड्याचा उमेश चव्हाण यांची दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती होणार आहे.
तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती गंगावेश तालमीचा भैरू माने आणि सांगलीतील भोसले व्यायामशाळेच्या प्रशांत शिंदे यांच्यात, चौथ्या क्रमांकाची कुस्ती मोतीबाग तालमीचा अरुण बोंगाडे आणि शाहूपुरी तालमीचा राघू ठोंबरे यांच्यात, पाचव्या क्रमांकाची कुस्ती बेनापूर तालमीचा अभिजित देवकर आणि सेनादलाचा सुशांत तांबुळकर यांच्यात होणार आहे. सहाव्या क्रमांकाची कुस्ती कुर्डुवाडी छत्रपती शिवराय कुस्ती संकुलाचा मोईन पटेल आणि । शाहूवाडीचा अजित पाटील यांच्यात होणार आहे. या मैदानात महिला गटातील दहा कुस्त्यांसह १३५हून अधिक कुस्त्या होणार आहेत.