मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेकडे इचलकरंजीकरांचे लक्ष!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी त्यांचा दौरा जिल्ह्याच्या पूर्व भागात होणार असून लोकसभा निवडणूक तयारीचा हा भाग मानला जात आहे. इचलकरंजीचे अर्थकारण वस्त्रोद्योगाभोवती फिरते. येथील यंत्रमागाला अलीकडे नव्याने शासनाला सादर केलेल्या शिफारशी दिलासा मिळाला आहे.

पण तूर्तास तो कागदोपत्री आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात याबाबत कोणतीही ठोस तरतूद करण्यात आलेली नाही. याबाबत राज्य शासनाची भूमिका वरकरणी सकारात्मक असली तरी त्याबाबत कृतिशील पावले पडत नाहीत ,अशी टीका असे यंत्रमागधारक करीत आहेत. याहीबाबतीत मुख्यमंत्री नेमकी कोणती भूमिका घेतात यावर इचलकरंजीकरांचे अर्थकारण आणि त्या अनुषंगाने निवडणुकीचे मतकारण ठरणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी कितीदा तरी केली आहे. पण पंचगंगेचे प्रदूषणाचे दशावतार काही संपत नाहीत. गेला आठवडाभर पंचगंगा नदीचे पाणी आत्यंतिक दूषित झाले आहे. मासे मरण्याचे, जलपर्णी वाढण्याचे प्रमाण वाढतच चालले असून त्यात पंचगंगा नदी प्रदूषणामुक्त करण्याची घोषणा वाहून जात आहे.

नदीचे पाणी काळेकुट्ट झाले असून करवीर, हातकणंगले, शिरोळ तालुक्यातील लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ नेहमीप्रमाणे हातावर हात बांधून बसले आहे. त्यामुळे अशा या संवेदनशील प्रश्नांची सोडवणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कसे करतात यावर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिंदेसेनेचे भवितव्य अवलंबून असणार आहे.