इचलकरंजीत टीम इंडियाच्या विजयानंतर जल्लोष

आपल्यापैकी बरेचजण हे क्रिकेट प्रेमी आहेत. अगदी उत्साहतेने ते प्रत्येक मॅच पाहत असतात. रविवारी भारत विरूध्द पाकिस्तान यांच्यात सामना झाला. दुपारी अडीच वाजता सामना सुरू झाला. इचलकरंजी शहरात त्यामुळे क्रिकेटप्रेमींनी सामना पाहण्याचा आनंद लुटला. परिणामी दुपारपासूनच शहरातील प्रमुख रस्त्यासह आजूबाजुचे रस्तेही रिकामे दिसत होते. खेळ सुरू असताना पाक संघाचा खेळाडू बाद झाल्यानंतर फटाके फोडले जात होते. तसेच भारतीय संघातील खेळाडूने चौकार तसेच षटकार ठोकल्यानंतरही फटाके फोडले जात होते.

अखेर भारताने सामना जिंकल्यानंतर क्रिकेटप्रेमींच्या उत्साहाला एकच उधाण आले. शहराच्या कानाकोपऱ्यातून दुचाकीवरून अनेक युवक जनता चौकात एकत्र येत मोठा जल्लोष साजरा केला. काही युवकांनी हातात विराट कोहलीचे पोस्टर घेऊन तर काहींनी तिरंगा ध्वज तसेच भगवा ध्वज घेऊन जल्लोष साजरा केला. आनंदोत्सव साजरा करताना अनेक युवकांनी फटाके फोडले तर काहींनी नाचून आपला आनंद साजरा केला.

या आनंदोत्सवा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच हुल्लडबाजीतून कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी गावभाग तसेच शिवाजीनगर पोलिसांनी जनता चौकात बंदोबस्त ठेवला होता.