माढ्याचे खासदार निंबाळकरांच्या वाहनावर चक्क गाजरांचा पाऊस…

माढा लोकसभा मतदारसंघात पाच वर्षात तब्बल एक लाख कोटी रूपयांचा विकास निधी आणल्याचा दावा करणारे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना त्यांच्याच मतदारसंघात आणि भाजपच्याच कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे लागले.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांच्या समवेत खासदार निंबाळकर हे माढा तालुक्यात असताना त्यांच्या वाहनांच्या ताफ्यावर चक्क गाजरांचा पाऊस पाडून त्यांचा निषेध करण्यात आला. तथापि, असा प्रकार घडलाच नाही, असा दावा खासदार निंबाळकर यांनी केला आहे.

या घटनेची चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाली असून त्यात पोलीस बंदोबस्तात निघालेल्या खासदार निंबाळकर यांच्या मोटारीवर काही तरूण गाजरे टाकताना दिसतात. माढा तालुक्यात रांझणी गावाजवळ हा प्रकार घडला. रांझणी-आलेगाव-गार अकोले-टाकळी-आढेगाव या नवीन रस्त्याच्या भूमिपूजनासाठी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व आमदार बबनराव शिंदे हे आले होते. त्यांच्या सोबत पोलिसांची सुरक्षा व्यवस्थाही होती. परंतु त्यांच्या वाहनांवर भाजपच्याच स्थानिक कार्यकर्त्यांनी तीन ते चार क्विंटल गाजरे फेकली. त्यामुळे रस्त्यावर गाजरांचा अक्षरशः सडा पडला होता.