पंकजा मुंडे यांचा 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांच्या राजकीय पुनर्वसनाची सातत्याने चर्चा होते. पंकजा यांना विधान परिषदेची किंवा राज्यसभेची संधी दिली जावी, अशी मागणी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांकडून सातत्याने केली जाते.
प्रत्येक विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीवेळी याबाबत चर्चा होते. पण पंकजा मुंडे यांना पक्षाकडून तशी संधी अद्याप देण्यात आलेली नाही. राज्यसभेच्या सहा जागांसाठी आता निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीत तरी पंकजा मुंडे यांना संधी दिली जावी, अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. पंकजा मुंडे यांच्या समर्थकांकडून वेळोवेळी याबाबतच्या मागण्या केल्या जातात.
सोलापूरच्या एका कार्यकर्त्याने पंकजा मुंडे यांच्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.सोलापूरच्या एका कार्यकर्त्याने पंकजा मुंडे या पहिल्या मुख्यमंत्री व्हाव्यात यासाठी पायी वारी काढली आहे. यासाठी हा कार्यकर्ता कोल्हापूरच्या ज्योतिबाला साकडं घालणार आहे. त्यासाठी सोलापूर ते कोल्हापूरच्या ज्योतिबा मंदिरापर्यंत हा कार्यकर्ता पायी जाणार आहे.
या कार्यकर्त्याचं नाव विजय काळे असं आहे. तो दक्षिण सोलापूर तालुक्यातील तांदुळवाडी गावाचा रहिवासी आहे. हा कार्यकर्ता सोलापूर ते कोल्हापूर असे साडेतीनशे किलोमीटरचे अंतर पायी चालत जाणार आहे.