महायुतीचा ‘कोल्हापूर’चा उमेदवार अजून ठरलेला नाही.परंतु,नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आपण कटिबद्ध राहुया.खासदार संजय मंडलिक हेच शिंदे गटाचे उमेदवार असे डोळ्यासमोर ठेवून काम सुरू आहे.खासदार धनंजय महाडिक यांना पंतप्रधान मोदी यांच्या कल्याणकारी योजनांची आकडेवारी तोंडपाठ आहे.
त्यांनी आता ‘मोदींची गॅरंटी’ तेवढी पाठ करावी,असा सल्ला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला.गडहिंग्लज शहरातील ४७ कोटींच्या नळयोजनेसह ५५ कोटींच्या विकासकामांचा प्रारंभ आणि बांधकाम कामगारांना भांडी संच वाटपप्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी खासदार संजय मंडलिक होते.खासदार धनंजय महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती.नगरपालिकेच्या प्रांगणात हा कार्यक्रम झाला.
मुश्रीफ म्हणाले, गडहिंग्लजच्या विकास कामांसाठी १०० कोटींचा निधी दिला. रिंगरोड आणि बायपास रस्त्याशिवाय शहरातील वाहतुकीची कोंडी दूर होणार नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी माझाही चांगली ओळख आहे. त्यांच्याकडे जाताना महाडिक यांनी मलाहीसोबत न्यावे, म्हणजे संकेश्वर – आंबोली महामार्गाप्रमाणे रिंग रोडचे कामही नक्कीच मार्गी लागेल.