गुरुवारपासून होणार द्राक्ष महोत्सव!

नागरिकांना चांगल्या प्रतीचे द्राक्ष मिळावेत आणि द्राक्ष फळासंबंधी ग्राहकांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी, या प्रमुख हेतून गुरुवार दि. ७ ते शुक्रवार दि. ८ मार्च या कालावधीत सांगलीतील कच्छी जैन भवन येथे द्राक्ष महोत्सवाचे आयोजन केले आहे.

या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या हस्ते होणार आहे. या महोत्सवासाठी द्राक्ष बागायतदार संघ, राज्य शासनाचा कृषी विभाग, रासायनिक खते व कीटकनाशक उत्पादन घेणाऱ्या कंपन्या, बेदाणा व्यापारी असोसिएशन आणि बाजार समितीने पुढाकार घेतला आहे.

द्राक्ष खाल्ल्याने होणारे आरोग्यासाठीचे फायदे यासंबंधी लोकांमध्ये माहिती पोहोचावी यासाठी राममंदिर चौकातील कच्छी भवनात द्राक्ष महोत्सव होणार आहे. द्राक्ष महोत्सवाच्या निमित्ताने ‘महाशिवरात्र द्राक्ष दिन’ म्हणून देशभरात दरवर्षी साजरा व्हावा आणि या दिवशी प्रत्येक घरोघरी आवडीने द्राक्षे आणि बेदाणे खाल्ले जावेत.

ज्यामुळे द्राक्ष फळांची मागणी वाढून दरामध्ये वाढ व्हावी व शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा हा द्राक्ष महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. महाशिवरात्रीला द्राक्षे खाल्ली जावीत हा संदेश सर्व देशभर पोहोचविण्याचा प्रयत्न आहे, असेही रवींद्र मुडे यांनी सांगितले.