महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील ठाकरे गटात प्रवशे करणार……

सांगली लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी निश्चित मानली जात आहे.चंद्रहार पाटील उद्या शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश करणार आहेत. काही दिवसांपूर्वी चंद्रहार पाटील यांनी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. उद्या दुपारी चार वाजता चंद्रहार पाटील मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.

यावेळी मोठं शक्ती प्रदर्शन केले जाणार असल्याची माहिती आहे. वंचित बहुजन आघाडीकडून सुद्धा चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीला पाठिंबा असल्याची माहिती आहे.लोकसभेच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षांनी शड्डू ठोकला असताना चंद्रहार पाटील देखील मैदानात उतरले आहेत. चंद्रहार पाटील यांनी स्वतः सांगली लोकसभा मतदारसंघाच्या आखाड्यात उतरणार असल्याची घोषणा केली होती.

लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी सर्वच पक्षांकडून मला ऑफर्स येत आहेत, तर मी ही लोकसभा लढवण्याच्या दृष्टीने तयारी करत आहे, असे सांगत चंद्रहार पाटील यांनी सांगलीच्या आखाड्यात लांघ बांधून तयार असल्याचे दाखवून दिले होते. मी लोकसभा लढवावी, अशी जिल्ह्यातील अनेकांची इच्छा आहे. मीही लोकसभा लढण्यास तयार आहे. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सांगली जिल्ह्यातील विट्यासह अनेक ग्रामीण भागात दौरेही केले आहेत. हे दौरे करताना लोकांच्या भावनाही जाणून घेत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.