दुष्काळाच्या झळा! काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागातील पाणी टंचाईवरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. सर्व काँग्रेस नेत्यांनी आज एकत्र येत सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.जिल्ह्यातील काही तालुक्याना हक्काचे पाणी मिळण्यासाठी आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने रस्त्यावर उतरून आंदोलन केले.

सांगली जिल्ह्याला दुष्काळाच्या झळा बसत आहेत. यावर आवाज उठवत आज माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली सांगली शहर व ग्रामीण जिल्हा काँग्रेसतर्फे सांगली कलेक्टर ऑफिसवर धडक मोर्चा काढण्यात आला.

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करून विश्रामबाग चौक येथून आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचा प्रारंभ झाला.तसेच जिल्ह्यामध्ये जत, आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ व जेथे चारा टंचाई निर्माण झाली आहे. अशा ठिकाणी मुक्या जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात.

म्हैसाळ योजनेचे आवर्तन बिनशर्त ठेवावे, विस्तापित म्हैसाळ योजनेचे काम युध्दपातळीवर पूर्ण करावे, सांगली महापालिका क्षेत्रात शुध्द व मुबलक पाणी पुरवठा करावा, कृष्णा नदी पावसाळ्यापर्यंत वहाती ठेवावी व पाणी उपसा बंदी लागू करु नये, अशा अनेक मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आल्या आहेत.