उन्हाळी सुट्ट्यांचा परिणाम! भाडे चक्क…..

होळीला लागून येणाऱ्या सुट्या, उन्हाळ्याच्या सुट्या आणि आगामी लोकसभेच्या निवडणुकीमुळे खासगी बसच्या भाड्यात मोठी वाढ होणार आहे. पुढील दीड ते दोन महिने या बसचे भाडे दीड पट होण्याची चिन्हे आहेत.

त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला चांगलीच कात्री लागण्याची चिन्हे आहेत. दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा पुढील काही दिवसांत संपून विद्यार्थ्यांना सुट्या लागतील. दुसरीकडे यंदा होळीचा सण रविवारी आला आहे, सोमवारी धुलिवंदनाची सुट्या आहे. तसेच त्या पुढील आठवड्यात गुड फ्रायडेलाही लागून सुट्या आल्या आहेत.

या सलग सुट्यांमुळे अनेकांनी गावी जाण्याचा बेत आखत रेल्वे आणि खासगी ट्रॅव्हल्सचे आरक्षण करण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर पुढील महिन्यात लोकसभेसाठी मतदान पार पडण्याची चिन्हे आहेत. यंदाची निवडणूक चुरशीची होणार, असे चित्र आहे. त्यामुळे राजकीय पक्षांकडून मतदारांना गावी घेऊन जाण्यासाठी बस गाड्यांना मागणी वाढेल, अशी अपेक्षा बस वाहतूकदार व्यक्त करत आहेत.

या सगळ्या पार्श्वभूमीवर तिकीट दर दीड ते दोन पट वाढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला चाट बसणार आहे. दरम्यान, खासगी बसचे आगाऊ ऑनलाइन बुकिंग करणाऱ्या संकेतस्थळावर २३ मार्चचे भाडे आताच दुपटीहून अधिक दिसून येत आहेत. त्यामुळे येत्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये शाळेला सुट्या लागल्यावर त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

‘या महिन्यात सलग दोन आठवडे वीकेंडला लागून सुट्या आल्या आहेत. तसेच निवडणुकीवेळी मतदानासाठी गावी जाणाऱ्यांची गर्दी असेल.

तसेच राजकीय पक्षांकडूनही बसचे बुकिंग मिळण्याची आशा आहे. त्यामुळे या काळात भाडे दीड पट असेल,’ अशी प्रतिक्रिया मुंबई बस मालक संघटनेचे जनरल सेक्रेटरी हर्ष कोटक यांनी दिली.