सर्व लोक दिवाळी साजरी करत असताना राज्यातील पोलिसांच्या सुट्ट्या, रजा रद्द करण्यात आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीचा बंदोबस्त असल्याने पोलीस महासंचालक कार्यालयाने त्यासंबंधीचे आदेश काढले आहेत.त्यामुळे राज्यातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांना १५ ते २५ नोव्हेंबर या काळात सुट्ट्या व रजा मिळणार नाही.
राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघासाठी मंगळवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी मत मोजणी होणार आहे. निवडणुका शांततेत पार पडावी यासाठी प्रत्येक मतदारसंघात पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे. पोलिसांच्या दिमतीला राज्य राखीव पोलीस दल, होमगार्ड असणार आहेत. राज्यातील सुमारे दीड लाख पोलीस, ४७ हजार होमगार्ड व राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या बंदोबस्तावर तैनात असणार आहेत.