अखेर डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे. याबाबतच्या वृत्ताला पै. चंद्रहार पाटील यांनी दुजोरा दिला आहे.जिल्हाभरातील कार्यकर्त्यांसह सोमवारी (दि. 11) दुपारी तीन वाजता मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ते पक्ष प्रवेश करणार आहेत. यासाठी जिल्हाभरातून शक्तिप्रदर्शन करीत कार्यकर्ते रवाना होणार आहेत.
लोकसभेच्या आखाड्यात उतरणार यावर चंद्रहार पाटील पहिल्यापासून ठाम आहेत. गेल्या वर्षभरापासून ते लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी करीत आहेत. बैलगाडा शर्यत, रक्तदान शिबिर महारॅली, गावोगावी संपर्क अभियान राबवून त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा मनसुबा अगोदरच व्यक्त केला होता.
गेल्या काही दिवसांपासून चंद्रहार पाटील यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील प्रवेशाच्या चर्चा सुरु होत्या. आज या चर्चेला पूर्णविराम मिळाला. याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख संजय विभुते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही प्रवेशाच्या वृत्ताला दुजोरा दिला.