सोलापूर शहरासह नदी काठचा गावांना पिण्याचा पाण्यासाठी उजनी धरणातून आज सोमवार दि. ११ पासून १ हजार ५०० क्युसेक विसर्गाने भीमा नदी पात्रात पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती धरण व्यवस्थापक अभियंता प्रशांत माने यांनी दिली.सोलापूर महानगर पालिकेने २० मार्च पर्यंत टाकळी व चिंचपूर बंधाऱ्यात पाणी सोडण्याची मागणी पत्राद्वारे केली होती.
त्यानुसार दि. ११ रोजी पहाटे ५ वाजलेपासून उजनी धरणातून १ हजार ५०० क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात येणार आहे. दर चार तासांनी वाढ करून एकूण ५ हजार क्युसेकपर्यंत पाणी सोडण्यात येणार असल्याचे अभियंता प्रशांत माने यांनी दिली. हे पाणी दि. २१ मार्चपर्यंत सोडण्यात येणार असून एकूण अंदाजे ५ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे.
सोलापूर शहरासह, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा व नदी काठच्या गावांना व शेतीसाठी या पाण्याचा उपयोग होणार असून पुढील दोन महिने पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. उजनी धरण ते टाकळी व चिंचपूर बंधारा हे २३२ किलोमीटर अंतर असून पाणी पोहचण्यास आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागतो.