आटपाडी तालुक्यात गेल्या तीन वर्षांपासून कापूस लागवड करण्यासाठी शेतकरी पुढे आले आहेत. त्यामुळे आटपाडी तालुक्याला कापसामुळे गतवैभव मिळले, अशी आशा निर्माण झाली आहे. यंदाच्या हंगामात दहा हजार बियाण्यांच्या पिशव्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या असून तालुक्याच्या पश्चिम भागात सुमारे दोन हजार हेक्टरवर कापसाची लागवड होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे.आटपाडी तालुका कापूस उत्पादनासाठी लौकिक होता.
मात्र, बोगस बियाणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे तालुक्यात कापसाचे पीक नामशेष झाले होते. कापसाच्या जागी डाळिंब पीक आले. त्यामुळे डाळिंब उत्पादन आणि निर्यातक्षम तालुक्याची नवी ओळख निर्माण झाली.दोन वर्षापूर्वी बाजार समिती आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून तालुक्यात पुन्हा एकदा कापूस लागवडीसाठी नियोजन केले.
आटपाडीच्या पश्चिम भागात खरसुंडी, नेलकरंजी, हिवतड, करगणी, आटपाडी, दिघंची, राजेवाडी, निंबवडे, बनपुरी, तळेवाडी, घरनिकी, घाणंद, झरे या भागात कापूस लागवड होत आहे.