माढ्यात मोठा ट्विस्ट, विधानसभेच्या आखाड्यात ‘किंगमेकर’ची एन्ट्री?

माढा विधानसभा मतदारसंघात राजकारण 360 अंशावर फिरत आहे. माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजितदादा पवार ) आमदार बबनदादा शिंदे यांनी निवडणूक न लढता मुलाला अर्थात रणजितसिंह शिंदे यांना मैदानात उतरवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील, बबनदादा शिंदे यांचे पुतणे धनराज शिंदे हे सुद्धा तयारी करत आहेत. यातच माढ्यात परिचारकांची ‘एन्ट्री’ झाली आहे.

युटोपियन शुगरचे अध्यक्ष, सरपंचकीच्या निवडणुकीपासून लोकसभेपर्यंत नेहमी पडद्याआडून सूत्र फिरवणारे आणि ‘किंगमेकर’, अशी ओळख असलेले उमेश परिचारक यांनी हे माढ्यातून निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. परिचारक गटातील कार्यकर्त्यांनी उमेश परिचारक यांच्याकडे निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव ठेवला आहे. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असं आश्वासन परिचारकांनी कार्यकर्त्यांना दिलं आहे.

परिचारकांनी निवडणूक लढल्यास रणजितसिंह शिंदे यांच्या अडचणी वाढू शकतात.माढा ( Madha ) विधानसभा मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील 42 गावांचा समावेश आहे. या 42 गावांत परिचारक गटाची मोठी राजकीय ताकद आहे. त्याशिवाय याच मतदारसंघात माळशिरस तालुक्यातील 14 गावांचा समावेश आहे. त्यात परिचारकांकडील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचा ही समावेश आहे. त्यामुळे माढा मतदारसंघातून परिचारकांना निवडणूक लढवणे सोपे असल्याचं कार्यकर्त्यांचं मत आहे.