इचलकरंजीत जलकुंभ उभारणीस गती…..

शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. तुलनेने वाढीव भागातील नागरिकांना पाण्याची सुविधा उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे नागरिकांना अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. याबाबत नागरिकांच्या सातत्याने महापालिकेकडे तक्रारी होत आहेत. त्यामुळे यावर उपाययोजना म्हणून शहराच्या वाढीव भागात जलकुंभ उभारण्याचा प्रस्ताव तयार केला होता.

त्याला शासनाने २ फेब्रुवारीला प्रशासकीय मंजुरी दिली होती. त्यामध्ये सात दिवसांत निविदा प्रक्रिया राबवण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे या कामाच्या निविदा प्रक्रियेकडे लक्ष लागले होते. याबाबत आमदार प्रकाश आवाडे यांनी शासन पातळीवर पाठपुरावा केला होता. आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ई निविदा जाहीर केली आहे. त्यामुळे या कामाला आता गती आली आहे.

महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाभियानअंतर्गत शहरात विविध सहा ठिकाणी जलकुंभ उभारणीच्या कामाला गती आली आहे.त्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून २६ कोटी ४९ लाखांची ई निविदा जाहीर केली.

या कामाची मुदत १८ महिने आहे. या जलकुंभ उभारणीनंतर शहरातील अपुरा व कमी दाबाने होणारे पाणीपुरवठ्याचा प्रश्न निकाली निघणार आहे. विशेषतः वाढीव भागातील सुमारे ७५ हजारांहून अधिक नागरिकांना सुविधा मिळणार आहे.