महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त बैठकीत शहरातील मुख्य रस्त्यावर बाजार भरविण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवतीर्थ चौक, के.एल.मलाबादे चौक ते गांधी पुतळा या मुख्य रस्त्यावर दरवर्षी दिवाळी बाजाराची लगबग दिसत असे. परंतु वाहतूक कोंडी, नागरिकांची गैरसोय आणि सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने यंदा हा निर्णय घेतला आहे.
महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या बैठकीत शहरातील गर्दी टाळण्यासाठी आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्थापनासाठी दिवाळी बाजारासाठी पर्यायी स्थळ निश्चित करण्यात आले आहे. यंदा थोरात चौक, आवळे मैदान आणि जिमनॅसियम मैदान या ठिकाणी दिवाळी बाजार भरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुख्य रस्त्यावरील जे दुकानदार दुकानाबाहेर मंडप घालतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल . तसेच कोणत्याही व्यापारांना मंडप घालण्यासाठी महापालिका पोलीस प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे. नियम मोडणाऱ्या व्यापाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. वर्षानुवर्षे भरणाऱ्या यंदाचा दिवाळी बाजार इचलकरंजी मुख्य रस्त्यावर भरणार नसल्याने किरकोळ व्यापारी व फेरीवालांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
